Offer

निर्भय विचारांना पंख आणि निखळ निर्मितीला आकाश देणारं ‘शब्द पब्लिकेशन’


बोरीवलीच्या वजिरा नाक्याजवळ 2003 साली शब्द द बुक गॅलरी नावाचे पुस्तकाचे दुकान मी सुरू केले. साहित्य, पुस्तके, प्रकाशनव्यवहार, पुस्तकवितरण या क्षेत्राशी स्वतःला जोडून घेतले. मध्य व दक्षिण मुंबईतून बाहेर पडलेली मराठी कुटुंबे उपनगरांमध्ये स्थिरावलेली होती पण त्यांच्या सांस्कृतिक गरजा भागवणारी यंत्रणा या परिसरात निर्माण झाली नव्हती. माझे काम ही यंत्रणा निर्माण करण्याचे आणि वाचनसंस्कृतीला पोषक वातावरण निर्माण करण्याचे आहे हे माझ्या लक्षात आले होते. यासाठी केवळ पुस्तकांच्या दुकानापुरते मर्यादित राहून चालणार नव्हते. वितरण, प्रकाशन आणि वातावरणनिर्मिती यांची एकत्र सांगड घालणे गरजेचे होते. उपनगरातील साहित्यसंस्कृतीमध्ये अशा रीतीने केलेला हस्तक्षेप अत्यंत सहजतेने सर्वदूर महाराष्ट्रात पसरू शकणार होता. परंपरेतून योग्य ते निवडून घेऊन मात्र पारंपरिक मार्ग सोडून वाटचाल करणे आवश्यक होते. म्हणूनच 2004 मध्ये मुकुंद कुळे यांच्या सहकार्याने ‘शब्द दीपोत्सव’ हा दिवाळी अंक प्रसिद्ध केला. दिवाळी अंकाबरोबरच ‘पंचलावण्य’ हे लावणीक्षेत्रात काम करणाऱया कलावंतांच्या जीवनावरील एक ललित पुस्तक तसेच अनंत सामंत यांची ‘मितवा’ ही कादंबरी प्रकाशित केली. प्रकाशनाच्या क्षेत्रातले हे माझे पहिले पाऊल होते. 2005-06-07 या तीन वर्षी मेघना पेठे यांनी ‘शब्द दीपोत्सव’च्या संपादनाची जबाबदारी घेतली. त्या तीन वर्षांमध्ये ‘शब्द दीपोत्सव’ या दिवाळी अंकाला साहित्यिक वर्तुळात एक मानाचे स्थान मिळाले. अशा तऱहेने ‘शब्द पब्लिकेशन’ ला सुरुवात झाली. 2008 सालच्या दिवाळी अंकाला महाराष्ट्र शासनाचा ‘शतकोत्तर’ दिवाळी अंकाचा पुरस्कार विभागून मिळाला. 2007 साली नामदेव ढसाळ यांच्यासारखा जागतिक कीर्तीचा कवी शब्द पब्लिकेशनला मिळाला. नामदेव ढसाळांच्या निवडक कवितांचा ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ हा उत्तम निर्मितीमूल्य सांभाळलेला संपादित संग्रह प्रकाशित झाला. यामुळे मराठीतील अनेक साहित्यिकांच्या नजरा ‘शब्द’कडे वळल्या. खप, पुरस्कारप्राप्ती हे निकष न ठेवता साहित्यक्षेत्रात माइलस्टोन ठरेल अशी साहित्यकृती शब्द पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होईल अशीच आपली वाटचाल असावी हे ठरविले. त्यासाठी खास ‘शब्द पब्लेकशन’चे म्हणता येईल असे धोरण ठरवणे गरजेचे होते. लेखनाचे गांभीर्य जपणारे नवे लेखक, ‘समाज, राजकारण, संस्कृती’ यांचे प्रखर भान, खुलेपणा, गुणवत्तेशी इमान या गोष्टी धोरणात एकत्र आणल्या गेल्या. विविध प्रकारचे साहित्यप्रकार शब्द पब्लिकेशनच्या माध्यमातून पुढे येत राहतील याची काळजी घ्यायची असे ठरले. या धोरणाला अनुसरूनच आजवर अनेक ग्रंथांची निर्मिती शब्द पब्लिकेशनने केली आहे.

व्यापक वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि पूरक वातावरणनिर्मिती साध्य करण्यासाठी 2005 साली ‘शब्दगप्पां’ ना सुरुवात झाली.


1 मे 2010 हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सवी दिन. या दिवसाचे औचित्य साधून ‘मुक्त शब्द’ मासिकाची सुरुवात झाली. साहित्य, समाज आणि संस्कृती यांच्याविषयी विचार करणारे, निर्भीडपणे विचार मांडणारे एक खुले, व्यासपीठ हे ‘मुक्त शब्द’ मासिकाचे स्वरूप आहे. साठनंतरच्या लेखन-वाचनाच्या पारंपरिक अभिव्यक्ती आणि अभिरुचीला मराठी साहित्यातील ज्या महत्त्वाच्या लेखक कवींनी आमूलाग्र वळण दिले अशा जवळजवळ सर्वच लेखक-कवींचे साहित्य जाणीवपूर्वक पुनर्मुद्रित करून अगदी नव्या रूपात वाचकांसमोर नेण्याचे काम ‘शब्द पब्लिकेशन’ आणि ‘मुक्त शब्द’ करत आहे.